संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 19 August 2022

केरळ राज्यात खळबळ; यूएईवरून आलेल्या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

तिरुवनंतपुरम – कोरोना रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत असतानाच ‘मंकीपॉक्स’ नावाचा आजार जगभरात वेगाने पसरतोय. या आजाराने जगातील अनेक देशांमध्ये कहर केला आहे. त्यातच आता मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण केरळमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. तीन दिवसांपूर्वी संयुक्त अरब अमिराती (यूएई)हून आलेल्या या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळली आहेत. आरोग्य विभागाने त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून त्यात मंकीपॉक्स असल्याचे उघड झाल्यास हा भारतातील या आजराचा पहिला रुग्ण असेल. दरम्यान, संबंधित व्यक्ती यूएईवरून भारतात आल्यावर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रवाशाचे नमुने घेतल्यानंतर ते पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. चाचणीचे निकाल आले की यावर अधिक स्पष्टपणे बोलता येईल. दरम्यान, मे महिन्यात युरोप आणि उत्तर अमेरिकेतील काही देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर या आजाराच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे स्पेन, पोर्तुगाल, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये अलर्टसुद्धा जारी करण्यात आला.

मंकीपॉक्स हा एक दुर्मिळ संसर्ग रोग आहे. १९५८ मध्ये संशोधनासाठी ठेवलेल्या माकडांमध्ये याचा प्रथम शोध लागला होता, तर १९७० मध्ये मंकीपॉक्सच्या पहिल्या मानवी रुग्णाची नोंद झाली होती. मंकीपॉक्स संक्रमित प्राण्याच्या चाव्यातून, रक्तातून किंवा शरीरातील घटकांतून पसरतो. उंदरांमुळेही हा रोग पसरत असल्याचे मानले जाते. तसेच संक्रमित प्राण्याचे मांस नीट न शिजवता खाल्ल्यानेही हा आजार होण्याची शक्यता असते. मानवामध्ये अंगदुखी, अंगावर पुरळ येणे, थंडी वाजणे ही मंकीपॉक्सची लक्षणे आढळतात. तसेच मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीला खूप ताप येतो आणि घशाजवळ गाठी दिसतात. ही लक्षणे दोन ते चार आठवडे टिकू शकतात. दरम्यान, मंकीपॉक्सची प्रकरणे रोखण्यासाठी योग्य वेळी योग्य उपाययोजना केल्या पाहिजे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami