सोलापूर : तिरुपती आणि वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.ज्यामुळे हजारो लोकांची घरे,पुरातन वाडे आणि दुकाने नष्ट होणार आहेत.त्यामुळे हे पंढरपूर कॉरिडॉर रद्द करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.यावर तोडगा काढण्यासाठी स्थानिक नागरिक राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. 29 नोव्हेंबर रोजी हे स्थानिक नागरिक कोल्हापूरात राज ठाकरेंकडे पंढरपूर कॉरिडॉर रद्द करण्यासंदर्भात मागणी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान,पंढरपूर कॉरिडॉर आणि विकास आराखड्याला तीव्र विरोध सुरु असताना सरकारकडून मात्र हा विकास आराखडा राबविण्यासाठी टेंडर प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.त्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार होऊ लागले आहे. एका बाजूला तोडगा काढण्यासाठी चर्चा करायची आणि दुसऱ्या बाजूला टेंडर प्रक्रिया सुरु करायची या सरकारच्या दुटप्पी धोरणामुळे पंढरपूर स्थानिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.