सिंधुदुर्ग – जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. परंतु आता जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची संततधार सुरू झाल्याने शेतकरी आनंदी झाले आहेत. मात्र या पावसामुळे ठिकठिकाणीचे जनजीवन विस्कळीत झाले असून छोटे-मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. कोकणातील अनेक पूल, रस्ते, शेतशिवारे पाण्याखाली गेले आहेत. तर, बाजारपेठांमध्ये पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे.
रत्नागिरीतील नद्या, नाल्यांसह धरणातील पाणीसाठा वाढला असून बळीराजा सुखावला आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. जिल्ह्यात शनिवारी सकाळपासूनच पावसाचा जोर होता. दिवसभर पडलेल्या पावसामुळे जगबुडी, वाशिष्ठी, काजळी, बावनदी, अर्जुना, कोदवली या नद्यांचे पाणी वाढले आहे. तर, कळझोंडी धरण भरून वाहू लागले आहे. तसेच पानवल, शिळ धरणातील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. सततच्या पावसामुळे नव्याने बांधलेल्या बावनदी ते देवरुख रस्त्यावर ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. त्याचबरोबर धाऊलवल्लीत रस्ता खचला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात काल सकाळपासून दुपारपर्यंत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. नदी, नाले पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. सायंकाळपर्यंत तालुक्यात पाऊस सुरूच होता. ग्रामीण भागात उशिरापर्यंत पूरस्थिती कायम होती. तालुक्यात सोमवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. दुपारपर्यंत ढगफुटीसारखा पाऊस कोसळल्याने सर्वत्रच नदी, नाले ओसंडून वाहू लागले. बऱ्याच सखल भागांतील पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली. होडावडा पूल, आरोस कोंडूरा, सोनुर्ली तिठा, रेवटावाडी, मळगाव सावळवाडी, कारीवडे, निरवडे, इत्यादी अनेक गावांतील पूल पाण्याखाली गेले.
दरम्यान, ओडिशाजवळ तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी छत्तीसगडवर स्थिरावले. तर दुसरीकडे पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, मान्सूनचा पश्चिम-पूर्व कमी दाबाचा पट्टा सध्या त्याच्या सर्वसाधारण स्थानापासून दक्षिणेला आहे. ही स्थिती राज्यात सर्वदूर पावसासाठी अनुकूल असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.