- वाडा – तालुक्यातील कुडूस येथील नामांकित शीतपेयाचे उत्पादन करणार्या कोकाकोला कंपनीने कायमस्वरुपी असलेल्या कामगारांना जबरदस्तीने स्वेच्छानिवृत्ती दिल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. कंपनी व्यवस्थापनाने सुमारे गेली 20 वर्षेे कंपनीत काम करणार्या कामगारांवर आकस्मिकपणे स्वेच्छानिवृत्ती लादल्याने या कामगारांवर बेकारीची कुर्हाड कोसळली आहे. या अन्यायाविरोधात विविध पातळ्यांवर आम्ही दाद मागत असून न्याय मिळाला नाही तर आम्हाला गंभीर स्वरुपाचे आंदोलन करावे लागेल, असा इशाराही कामगारांनी दिला आहे.
- हिंदुस्थान कोकाकोला ब्रेव्हेजस प्रा. लि. या नामांकित कंपनीचा मोठा प्रकल्प वाडा तालुक्यातील कुडूस येथे आहे. या कंपनीचे प्रशासन आणि कामगार यांच्यात अलीकडच्या काळात मोठे वाद होऊ लागले आहेत. काही महिन्यांपूर्वी कामगारांना बोलावून तुम्हाला परराज्यातील दुसर्या प्रकल्पामध्ये जावे लागेल. अन्यथा स्वेच्छानिवृृत्ती घ्या असे बजावले. त्यानंतर 62 कामगारांना नियमानुसार कोणतीही प्रशासकीय प्रक्रिया न राबवता स्वेच्छानिवृत्ती लादत कामावरुन कमी करण्यात आले. कंपनीने केलेल्या अन्यायाविरुध्द हे कामगार सदस्य असलेल्या भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकार्यांनी कामगारांच्या बाजूने उभे राहण्याऐवजी कंपनीसोबत साटेलोटे केल्याचा आरोपही कामगारांनी केला आहे. गेली 20 वर्ष एका कंपनीमध्ये काम केल्यानंतर आता 40 ते 45 वर्ष वयोमान झालेल्या कामगारांनी करायचे काय? असा प्रश्न कामगारांना सतावू लागला असून कंपनी प्रशासनाने केलेल्या अन्यायाबाबत या कामगारांनी मुख्यमंत्री, कामगार मंत्री, कामगार आयुक्तांकडे न्याय मागण्यांसाठी निवेदनाद्वारे साकडे घातले. मात्र त्यांना न्याय मिळालेला नाही.