मुंबई – मुंबई महापालिकेच्यावतीने २०० ई बसेसची निविदा काढण्यात आली होती. त्यानंतर ती ४०० करण्यात आली होती आणि प्रत्यक्षात मंजुरी मिळेपर्यंत कुठलीही पूनर्निविदा न काढता ती ९०० पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच एक लाख रुपये भाग भांडवल असणाऱ्या कोझेस ई मोबिलीटी प्रायेव्हेट लिमिटेड या विशिष्ट कंपनीला ७०० बसेसचे पुनर्निविदा न काढता २८०० कोटी कंत्राट दिले, असा खळबळजनक आरोप भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांनी केला आहे. तसेच त्या कंपनीसमवेत बेस्ट २८०० कोटी काम कसे दिले जाते? नेमके कोणासाठी हे केले जाते?’ असा प्रश्न मिहिर कोटेचा यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारला आहे.
या संपूर्ण प्रकरणी आपण कॅगकडे तक्रार दाखल करणार असून मुंबई उच्च न्यायालयात देखील दाद मागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच हे कंत्राट मुंबई महानगरपालिकेने रद्द करावे अन्यथा या संपूर्ण प्रकरणी प्रखर आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
याप्रकरणी अधिक माहिती देताना मिहिर कोटेचा म्हणाले की, आम्ही मुंबईकरांचा मोकळ्या हवेत श्वास घेण्याचा हक्क शिवसेनेच्या या घोटाळ्याला हिरावून देणार नाही. डिसेंबर मध्ये २०० दुमजली एसी इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर देण्याची निविदा बेस्ट करून काढण्यात आली होती. मात्र प्रस्ताव मंजूर करताना २०० ऐवजी अचानक ९०० बसेस करण्यात आल्या. यामध्ये केंद्राकडून जे बेस्टला ३०० कोटी रुपये मिळाले आहेत. ते लाटण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय शुद्ध हवा वायू अभियानासाठी मुंबई शुद्ध हवा यासाठी निधी दिला गेला. आता निधी मार्च महिन्यापर्यंच खर्च केला नव्हता म्हणून तात्काळ गडबड करत टेंडर काढले गेले. कायदा पायमल्ली करत कंत्राट दिले, असा आरोप कोटे यांनी केला आहे.