संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

कोरेगाव तालुक्‍यातील ‘राजमा’ धोक्यात पावसाच्या पाण्याने पीक शेतात कुजले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सातारा – जिल्ह्यातील कोरेगाव तालुका हा राजमा म्हणजेच घेवडा पिकासाठी ओळखला जातो.अगदी दिल्ली आणि उत्तर भारतात इथल्या राजमा पिकाला मोठी मागणी असते.मात्र ऑगस्ट महिन्यातील संततधार पाऊस आणि किडीच्या प्रादुर्भावाने या तालुक्‍याच्या उत्तर भागातील ‘राजमा’ अर्थात घेवडा पीक यंदा धोक्‍यात आले आहे. त्यातच काढणी सुरू असताना पावसाने दमदार हजेरी लावल्याने वाटाणा पिकाचीही धूळधाण झाली आहे.तरी पावसाने झालेल्या नुकसानीचे शासनाने तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी,अशी मागणी जोर धरत आहे.
कोरोनामुळे ग्रामीण अर्थकारण बिघडून गेलेले असताना आता निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे. तालुक्‍याच्या उत्तर भागात खरीप हंगामात घेवडा पीक घेतले जाते.सोबतीला वाटाणा,बटाटा,सोयाबीन आणि कडधान्ये केली जातात.घेवड्यामुळे कोरेगावची ओळख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झाली आहे.या पिकातून कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळते.मात्र,गेल्या काही वर्षांत निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या पिकाला बसत असून, शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडून गेले आहे.
तालुक्याच्या उत्तर भागातील पिंपोडे बुद्रुक,भावेनगर, वाठार स्टेशन,तडवळे, नांदवळ,अनपटवाडी, नायगाव आदी गावांच्या परिसरात राजमा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी वळीव पाऊस लवकर झाल्याने मशागती वेळेवर उरकून जूनच्या अखेरीस पेरण्या झाल्या. पाऊस अधूनमधून हजेरी लावत राहिला.त्यामुळे सर्वच पिके जोमात आली. शेतकऱ्यांनी कोळपणी आणि खुरपणी केली. औषध फवारणी झाली. ऑगस्ट महिन्यात मात्र सततच्या पावसाने घेवडा व वाटाणा पीक अडचणीत आले.अनेक ठिकाणी शेतात पाणी साठू लागल्यामुळे पिके कुजून गेली.त्यावर किडीचा मोठा प्रादुर्भाव झाला.घेवडा काढणीची धांदल सुरू आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात जोरदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे घेवडा भिजून मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. घेवड्याला गत दोन वर्षांपूर्वी जागतिक मानांकन मिळाले आहे.पीक विम्यात घेवड्याचा समावेश करा जागतिक बाजारपेठेत पोचलेल्या घेवड्याचा समावेश पीक विम्यात करावा अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami