नवी दिल्ली – नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने सोनिया गांधी यांना गुरुवार, २३ जून रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज ईडीला पत्र लिहून एजन्सीसमोर हजर राहण्यासाठी आणखी काही आठवड्यांचा अवधी मागितला आहे. कोरोना व फुप्फुसाच्या संसर्गातून पूर्णपणे बरी होईपर्यंत आराम करू द्यावा, असे सोनिया गांधी यांनी ईडीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
कोरोना आणि फुप्फुसाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सोनिया गांधी यांना घरी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनी आज ईडीला पत्र लिहून पूर्णपणे बरी होईपर्यंत हजेरी काही आठवडे पुढे ढकलण्याची मागणी केल्याचे ट्विट काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केले आहे. सोनिया गांधी यांना सोमवारी दिल्लीतील खासगी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासाला राजकीय सूडबुद्धी म्हणत काँग्रेसने तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षनेत्यांना लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे.