नवी मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर पडत नाही तर तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आहेच. कोरोनाची तिसरी लाट येणार असे भाकीत आरोग्य तज्ञांकडून केले जात असून कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांमध्ये सांधेदुखी, श्वसनविकार तसेच शारीरीक व मानसिक थकवा वाढल्याचे दिसून आले आहे. तेरणा फिजियोथेरेपी कॉलेजच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. माधवी डोके सांगतात, “पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोना झालेल्या नागरिकांना विविध प्रकारच्या समस्या होत असून यातील मुख्य समस्या म्हणजे सांधेदुखी असून शंभरातील वीस नागरिकांना याचा त्रास होत आहे. अनेक कोरोनामुक्त नागरिकांना घरी गेल्यानंतरही त्यांना अस्वस्थ वाटत असून सांधेदुखी, स्नायूदुखी, थकवा येणे, या आणि अशा बऱ्याच तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे जात आहे. त्यांची रुग्णसंख्या किती आहे? याची निश्चित आकडेवारी सध्या उपलब्ध नसली तरी याकरिता बऱ्याच विशेष शासकीय, खाजगी आणि महापालिकेच्या रुग्णलयात पोस्ट-कोविड (कोरोना मुक्त रुग्णांकरिता) ओपीडी सुरु करण्यात आली आहे व ही माहिती काही दिवसात उपलब्ध होईल, परंतु सांधेदुखीच्या समस्येत नक्कीच वाढ झाली आहे.
ते पुढे म्हणाले की, लॉकडाउनमुळे शरीराची थांबलेली हालचाल, कॅल्शियमची कमतरता, कोरोनामुळे आलेला अशक्तपणा, वाढत्या वयानुसार आलेला थकवा अशी अनेक करणे सांधेदुखीची असू शकतात परंतु याचे योग्य निदान होणे गरजेचे आहे. सांधेदुखीवर रामबाण उपाय म्हणजेच फिजियोथेरेपी हाच आहे. नियमित फिजियोथेरेपीच्या मदतीने सांधेदुखी खूप प्रमाणात कमी होऊ शकते हेच आम्ही आज इथे आलेल्या रुग्णांना समजावून सांगितले.
कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही , कोरोनामुक्त झालो म्हणजे आजारमुक्त झालो असा गैरसमज करून घेऊ नये कारण कोरोनाच्या संक्रमणामुळे शरीरातील अनेक पेशीचे नुकसान झालेले असते, अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन नियमित उपचार करणे गरजेचे आहे.”