जागतिक आरोग्य संघटनेची माहिती
नवी दिल्ली- कोरोनानंतर आता जगभरात गोवर या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे.या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे.तसेच या रोग फैलावण्याचे कारणही स्पष्ट केले आहे.कोरोना महामारी काळात गोवर प्रतिबंधक लसीकरण कमी झाल्याने तसेच या रोगाबाबत खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे गोवरचा जगभरात धोका वाढल्याचे जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेच्या सार्वजनिक आरोग्य एजन्सीने म्हटले आहे.
गोवर हा सर्वात संसर्गजन्य विषाणूंपैकी एक आहे आणि लसीकरणाद्वारे त्याचा प्रादुर्भाव रोखणे शक्य आहे. लोकांमध्ये त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ९५ टक्के लसीकरण आवश्यक आहे. कोरोना महामारी काळात २०२१ मध्ये सुमारे ४ कोटी मुलांचा गोवर लसीचा डोस चुकला, असे यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने संयुक्त अहवालात म्हटले आहे.
मागील वर्षांच्या तुलनेत गोवर रुग्णांची संख्या तेवढी वाढलेली नसली तरी आता त्यावर प्रतिबंध आणण्याची गरज असल्याचे डब्ल्यूएचओ च्या गोवर प्रतिबंधक विभागाचे प्रमुख पॅट्रिक ओकोनोर यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे. ”गोवरवर नियंत्रण मिळवण्यासाठी १२ ते १४ महिने आव्हानात्मक असणार आहे,” असे त्यांनी नमूद केले आहे. डब्ल्यूएचओने २०२२ च्या सुरुवातीपासून ते सप्टेंबरपर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे म्हटले आहे.विशेषतः उप-सहारा आफ्रिकी देशांत याचा प्रादुर्भाव वाढल्याने डब्ल्यूएचओ ने चिंता व्यक्त केली आहे