लंडन – मागील दोन वर्षात कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी जगभर प्रभावी लसी विकसित करण्यात आल्या व या लसींमुळे ही महामारी आटोक्यातही आली. विशेष म्हणजे ही कोरोनाची लस तयार करण्यासाठी ज्या तंत्राचा वापर करण्यात आला, तो अन्यही आजारांवरील लस बनवण्यासाठी प्रेरक ठरला. कारण तशाच पद्धतीने आता कर्करोगासारख्या गंभीर आजारावरही प्रभावी लस विकसित केली आहे आहे. या लसीमुळे त्वचेच्या कर्करोगाने होणार्या मृत्यूंमध्ये ४४ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. कर्करोगावरील उपचारात ही नवी लस चांगला पर्याय बनू शकते असे संशोधकांना वाटत आहे.
कोरोनावरील लस बनवण्यासाठी मॉडर्ना आणि फायजरने ज्या तंत्राचा वापर केला होता तशाच पद्धतीने ही कर्करोगावरील लस विकसित करण्यात आली आहे.या लसीच्या दुसर्या टप्प्यात तिला किट्रूडा औषधाबरोबर मिसळले गेले. त्यामुळे जे परिणाम समोर आले त्यावरून असे दिसले की या लसीने त्वचेचा कर्करोग पुन्हा होण्याचा किंवा यामुळे मृत्यू होण्याचा धोका ४४ टक्क्यांनी घटला आहे. ही लस १५७ रुग्णांना देण्यात आली होती. हे सर्वजण मेलेनोमा कॅन्सरच्या तिसर्या किंवा चौथ्या टप्प्यातील होते. उपचारानंतर त्यांच्या ट्यूमरला शस्त्रक्रिया करून हटवले गेले होते.
एका आकडेवारीनुसार, ब्रिटनमध्ये दरवर्षी ३६ पुरुष आणि ४७ महिला आपल्या जीवनकाळात कधी ना कधी त्वचेच्या कर्करोगाने ग्रस्त होतात. ‘किट्रूडा’ ही एक अँटिबॉडी असून तिचा वापर मेलेनोमा, फुफ्फुसाच्या कर्करोगाशिवाय डोके व गळ्याच्या कर्करोगावरील उपचारातही केला जातो. ‘एमआरएनए’च्या प्रयोगातून ही नवी लस विकसित करण्यात आली आहे. ती त्वचेच्या कर्करोगात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.संशोधकांनी ‘एमआरएनए-४१५७/व्ही ९४०’ ला अशाप्रकारे तयार केले की ती रोगप्रतिकारक शक्तीला प्रतिक्रिया देणार्या टी-सेल्स या पेशींना मजबूत करील. बर्मिंघम युनिव्हर्सिटीतील संशोधक अँड्र्यू बेग्स यांनी सांगितले की ही एक ‘गेम चेंजर’ लस आहे. लवकरच तिची तिसरी चाचणी सुरू होणार आहे