मुंबई- मुलीचा कोरोना लसीमुळे मृत्यू झाल्याचा दावा करत एका वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत एक हजार कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. लसीच्या दुष्परिणामामुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा वडिलांचा दावा आहे. औरंगाबाद येथे राहणारे दिलीप लुणावत या पीडित वडिलांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेनुसार त्यांची मुलगी ही वैद्यकीय विद्यार्थीनी होती. त्यांना सांगण्यात आले की, कोरोनाची लस पुर्णपणे सुरक्षित आहे आणि त्यामुळे शरीरावर कोणताही चुकीचा परिणाम होत नाही. यामुळे स्वतः आरोग्य सेविका असल्याने तिने आपल्या महाविद्यालयात लसीचा डोस घेतला असता त्याचे
दुष्परिणाम झाले आणि तिचा मृत्यू झाला. आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि इतर लोकांचे प्राण वाचविण्यासाठी आपण ही याचिका दाखल करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच चुकीची माहिती देऊन आपल्या मुलीला लस देण्यात आली हे सरकारने मान्य करावे आणि एक हजार कोटींची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही त्यांनी याचिकेतून केली आहे.