कोल्हापूर – जिल्ह्यातील हिरण्यकेशी ही प्रसिद्ध नदी चक्क उलट्या दिशेने वाहू लागल्याची घटना शनिवारी सायंकाळी दिसून आली. नदीवर गोटूर बंधारा असून त्याच्याजवळच ही आश्चर्यकारक घटना घडली. कर्नाटकात मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर हा चमत्कार घडल्याचे बोलले जात आहे.
कर्नाटकात पाऊस पडल्यानंतर ओढ्याचे पाणी वाहून हिरण्यकेशी नदीत आले. हा पाण्याचा प्रवाह पूर्वेला कर्नाटकात वाहून न जाता उलट्या दिशेने म्हणजेच पश्चिमेकडे राष्ट्रीय महामार्गाकडे वाहायला लागला. कर्नाटकातील निडसोशी, कमतनूर, गोटूर व पंचक्रोशीत ढगफुटीसदृश्य मुसळधार पाऊस झाला. यामुळे या भागातील ‘कापूर’ नावाने ओळखला जाणारा ओढा दुथडी वाहू लागला. हिरण्यकेशी नदीवरील गोटूर बंधार्याच्या पूर्वेला म्हणजेच कडलगेच्या दिशेला नदीपात्रात येऊन मिळाला आहे. ओढ्याचे हे पाणी थेट नदीपात्रात आले पण आश्चर्य म्हणजे ते वाहून आलेले पाणी पूर्वेकडे न जाता पश्चिमेकडे जात होते. १५ वर्षांपूर्वी याच नदीवर अशी घटना घडली होती.