कोळसा शोधता शोधता मोती सापडला

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print
  • भाग्यश्री फोडकर

महाराष्ट्रीयन परंपरेच्या दागिन्यांमध्ये मोत्याच्या दागिन्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. मोत्याचा दागिना घ्यायचा म्हटलं की पहिले नाव लागू बंधू ज्वेलर्स यांचे येते. गेल्या चार पिढ्यांपासून ते या व्यवसायात आहेत. मोत्याच्या व्यवसायात ते कसे आले? काळानुरूप व्यवसायात कसा बदल होत गेला? लॉकडाऊनचा काळ त्यांना कसा गेला? यासह बरीच माहिती लागू बंधू मोतीवालेचे संचालक दिलीप लागू यांच्याशी केलेल्या चर्चेतून जाणून घेतली आहे.

प्रश्‍न: मोत्याचे दागिने म्हटले की, लागू बंधू ज्वेलर्सचे नाव घेतले जाते. आपली खूप जुनी परंपरा आहे. या व्यवसायात कसे काय आलात?

उत्तर: माझ्या आजोबांनी प्रथम या व्यवसायाला सुरुवात केली. ते माईनिंग इंजिनिअर होते. मोत्यांचे कल्चर प्रोसेस सर्वप्रथम जपानच्या निकी मोटो या कंपनीने सुरु केले होते. या कंपनीची एक टीम प्रमोशनसाठी भारतात आली होती. त्यांनी माझ्या आजोबांना विचारणा केली की, तुम्ही मोत्यांचा बिझनेस चालू करणार का? त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचा सल्ला ऐकून माझ्या आजोबांनी कोळशाचा बिझनेस सोडून मोत्याचा व्यवसाय सुरू केला. तेव्हापासून आतापर्यंत या व्यवसायात आमची चौथी पिढी काम करत आहे.

प्रश्‍न: काळाच्या ओघात या व्यवसायात कसे बदल होत गेले?

उत्तर: पहिल्या 50 ते 60 वर्षांत केवळ ग्राहकांच्या कौतुकामुळे धंदा वाढत गेला. जाहिरात करणे अथवा शाखा वाढवणे असे काही नव्हते. पुण्यात एक दुकान होते ते कालांतराने बंद झाले. पण आता ते नव्या जागेत पुन्हा सुरु झाले आहे. तिथे काही वर्षांचा खंड तेथे पडला पण मुंबईतील दुकान 1936 सालापासून सुरु आहे. मी 1997- 98 नंतर व्यवसायाचा विस्तार करायला सुरुवात केली. आमच्या ब्रॅन्चेस अधिक वाढल्या. सुरुवातीच्या काळात घरातील माणसे आणि दोन चार नोकरवर्ग असाच सेटअप होता. 10 बाय 12 चे छोटे दुकान होते.

मोत्याचे दागिने आम्ही करतोच. मोती हे आमचे वैशिष्ट्य आहे. त्याला डिमांड आहेच पण मी व्यवसायात लक्ष घातल्यानंतर थोडा फोकस बदलला. जेम स्टोन्स आणि नवग्रहाच्या खड्यांनाही चांगली मागणी आहे. आता डायमंडलाही खूप महत्त्व आले आहे. त्याची मागणीही येत्या काळात आणखी वाढणार आहे. हिऱ्यांचे माईनिंग करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी टीबीएसने 1997 मध्ये भारतात आपले ऑफिस सुरु केले. भारतात हिऱ्यांचे प्रमोशन त्यांनी मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात केली. हिरे हे किफायतशीर आहेत आणि ते कोणीही खरेदी करू शकतो, असे प्रमोशन सुरू आहे. त्यामुळे यापुढे हिऱ्यांच्या दागिन्यांना महत्त्व प्राप्त होणार आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांच्या संदर्भात सांगायचे तर आमच्याकडे उत्तम दर्जाचे हिऱ्यांचे दागिने आहेत. फॉर एव्हर मार्क या आघाडीच्या ब्रॅन्डचे हिरे आमच्याकडे आहेत. हा ब्रॅन्ड मोजक्याच ज्वेलर्सकडे आहे त्यातील आम्ही एक आहोत.

भारतात आम्ही एकमेव ज्वेलर्स होतो की, प्लेन सोन्याचे दागिने आम्ही ठेवत नव्हतो. मोती, पोवळे, स्टोन्ससह असलेले सोन्याचे दागिने आम्ही ठेवायचो. पण आता या दागिन्यांबरोबर सोन्याचे प्लेन दागिनेही आम्ही विक्रीसाठी ठेवण्यास सुरुवात केली आहे आणि आता सोन्याचे दागिनेही बऱ्यापैकी वाढवले आहेत. जेव्हा आम्ही ठाणे, डोंबिवली, बोरिवली या उपनगरात दुकाने सुरु केली तेव्हा आमच्या लक्षात आले की, काही ग्राहक रोज वापरायचे सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी येतात. मात्र आम्ही त्यांना त्यावेळी सांगायचो की, आमच्याकडे केवळ मोती, हिरे आणि इतर रत्नांचे दागिने आहेत. मग ते आत येऊन दागिने न बघताच निघून जायचे. त्यामुळे आता आम्ही आमची संकल्पना बदलली आहे. आम्ही आता प्लेन सोन्याचेही दागिने ठेवले आहेत. आता सोन्याचे दागिने बघताना ग्राहक मोती आणि हिऱ्यांचे दागिनेही बघतो आणि अनेकदा सोन्याच्या दागिन्यांबरोबर तेही खरेदी करतो. त्यामुळे आता आम्ही सर्व प्रकारचे दागिने ठेवतो, असे म्हणायला हरकत नाही.

प्रश्‍न: पारंपरिक दागिन्यांकडे ग्राहकांचा कल आहे की कमी ग्रॅमच्या हलक्या दागिन्यांकडे आहे?

उत्तर: तन्मणीसारखा पारंपरिक दागिना या काळात लोकांच्या आठवणीच्या बाहेर गेला होता. त्याला आम्ही पुन्हा नव्या स्वरुपात ग्राहकांसमोर आणला आहे. लोकांना तो आता आवडायला लागला आहे. त्याचीही मागणी वाढली आहे. पूर्वी तन्मणीचे खोड (पेंडंट) हे चांदीचे असायचे. आता आम्ही ते सोन्यात करून देतो. खरे मोती आणि खड्यांचा आम्ही वापर करतो. खडे सिंथेटिक असतात. खरे खडेही वापरू शकतो मात्र तसे केले की त्याची किंमत वाढते.

सोन्यात घडवलेले आमचे माणिक, पाचूच्या दागिन्यांनाही खूप मागणी आहे. पाचू, माणिकबरोबर विविध रंगांच्या खड्यांचा वापर करून तयार केलेले दागिनेही नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत. मॅचिंग म्हणून महिला अशा प्रकारचे दागिने अनेकदा घेतात. विविध रंगांचे खडे वापरून आम्ही दागिने तयार करतो. हे खडे फार महागही नसतात. त्यामुळे पारंपरिक दागिन्यांबरोबर नव्या पद्धतीच्या दागिन्यांची जोडही महिलांची पसंती ठरली आहे.

प्रश्‍न: गेले दीड वर्षे कोरोनामुळे लॉकडाऊन होते, तो काळ सर्व ज्वेलर्ससाठीही कठीण काळ ठरला होता. कशी परिस्थिती होती तेव्हा?

उत्तर: 2020च्या एप्रिल-मेमध्ये कोणालाही अंदाज नव्हता की, कोरोनाचा बंद किती काळ राहणार आहे. 15 दिवस, महिना असे वाढत वाढतच गेले. मागच्या वर्षी व्यवसायावर खूपच परिणाम झाला. व्यापाराची देणी वाढत होती. काही लोकांनी सोनेही या काळात विकले. मात्र त्यानंतर सोन्याचे भाव जून-जुलैमध्ये वाढायला सुरुवात झाली तेव्हा लोकांचा कल सोने विकत घेण्याकडे वळला. सोन्याचे भाव आणखी वाढतील म्हणून लोकांनी सोने खरेदी करण्यास सुरुवात केली. आमच्याकडेही इतकी मागणी वाढली की आम्ही सोन्याची नाणी विकायचो नाही पण आम्हीही ते विकायला सुरुवात केली. आम्हालाही त्यावेळी आश्‍चर्य वाटले. आता यावर्षीच्या लॉकडाऊननंतर जी सुरुवात झाली आहे ती चांगलीच सुरुवात झाली आहे. मार्केट अगदी जोरात आहे.

Close Bitnami banner
Bitnami