मुंबई – जगातील दिग्गज टेनिस स्टार सर्बियाचा नोव्हाक जोकोविच याने कोविड लस न घेण्याच्या त्याच्या निर्णयानंतर टेनिस विश्व ढवळून निघाले. याचा फटका त्याला स्वतःला देखील बसला. वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तो खेळू शकला नाही. यामुळे राफेल नदालने बाजी मारली. तरी देखील या २० वेळा ग्रँड स्लॅम विजेत्याने आता मोठे विधान केले आहे. त्याने म्हटले आहे की कोविड लस घेण्यासाठी मला दबाव आणला गेला तर भविष्यात टेनिस स्पर्धा देखील खेळणार नाही. मी लसीच्या विरोधात नाही पण माझे देखील काही वैयक्तिक निर्णय असू शकतात, असे देखील त्याने म्हटले आहे. एका प्रसिद्ध माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही माहिती दिली.
दरम्यान, कोरोना लस न घेल्यामुळे ऑस्ट्रेलियन सरकारने त्याचा व्हिसा रद्द केला. ९ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा जोकोविचला स्पर्धा न खेळताच मेलबर्न सोडावे लागले. या सर्व प्रकरणानंतरही जोकोविच लस न घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहे, यासाठी मोठी किंमत मोजण्याची त्याची तयारी आहे. कोरोना लशीच्या मुद्यावर ऑस्ट्रेलियन नंतर फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन या स्पर्धा देखील सोडण्याची जोकोविचची तयारी आहे. ऑस्ट्रेलियातून परत पाठवल्यानंतर जोकोविचनं पहिल्यांदाच या विषयावरील मौन सोडले. त्यावेळी त्यानं ही भूमिका मांडली.
आपण कोरोना लसीकरण मोहिमेच्या विरोधात नाही, पण त्या मोहिमेत माझा सहभाग नाही. असे जोकोविचने मुलाखतीमध्ये स्पष्ट केले. ‘सर्व लोकांना त्यांना योग्य वाटेल ती गोष्ट निवडण्याचा अधिकार आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार मी लस न घेण्याचे ठरवले असल्याचे त्याने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले. जोकोविचने आजवर दोन वेळा फ्रेंच ओपन आणि सहा वेळा विम्बलडन स्पर्धा जिंकली आहे. जोकोविचनं यावेळी ऑस्ट्रेलियात घडलेल्या घटनांवर देखील नाराजी व्यक्त केली. ‘मी लस घेतली नाही, एखादा नियम मोडला किंवा माझ्या व्हिसामध्ये काहीतरी चूक होती. त्यामुळे मला परत पाठवले नाही. मी ऑस्ट्रेलियात कोरोना लसीकरणाच्या विरोधी वातावरण तयार करत आहे, असे त्यांच्या मंत्र्यांना वाटले त्यामुळे त्यांनी माझा व्हिसा रद्द केला. मी त्या विषयावर पूर्णत: असहमत आहे,’ असे जोकोविचने यावेळी सांगितले.