मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविडच्या नियमाचे उल्लंघन केल्याची ऑनलाइन तक्रार भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी मुंबईच्या मलबार हिल पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. ठाकरे पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांच्यासोबत नेत्यांची बैठक झाली नव्हती. असे असताना काल सायंकाळी मुख्यमंत्री काही लोकांना भेटले आणि कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल सकाळी एन्टीजन कोरोना चाचणी झाली. ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. नंतर सायंकाळी मुख्यमंत्र्यांची आरटीपीसीआर चाचणी केली. ती निगेटिव्ह आल्यामुळे सायंकाळी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. वर्षा निवासस्थान सोडताना वरळी, सी-लिंक टोल नाका आणि कलानगर जंक्शन येथे गाडीतून उतरून लोकांना अभिवादन केले. त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत गर्दीतून त्यांनी वाट काढली. गाडीत बसून ते मातोश्रीच्या दिशेने गेले. यात त्यांनी कोरोनाच्या नियमांची पायमल्ली केली. त्यामुळे त्यांच्याविरोधात बग्गा यांनी तक्रार केली आहे.