नवी दिल्ली – भारताचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा अनुभवी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. रॉबिनची पत्नी शीतल उथप्पाने गुरुवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला. रॉबिनने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. या फोटोमध्ये नव्या पाहुणीसह तिचा मोठा भाऊ आणि आई, बाबा दिसत आहेत. या फोटोवर सध्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा जणू पाऊस पडत आहेत.
‘कळविण्यास आनंद होतोय की, आमच्या आयुष्यात एका परीचे आगमन झाले आहे. ट्रिनिटी थिया उथप्पा अशी तिची ओळख आहे. तुझे पालक म्हणून आमची निवड केल्याबद्दल धन्यवाद’, असे कॅप्शन लिहून रॉबिनने आपल्या मुलीचे नामकरण ‘ट्रिनिटी थिया’ असे केल्याचे जाहीर केले. दरम्यान, २०१७ साली रॉबिन आणि शीतल पहिल्यांदा पालक झाले होते. त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव नील नोलन उथप्पा असे आहे.
रॉबिन उथप्पाने भारतासाठी ४६ एकदिवसीय आणि १३ टी-ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये जवळपास २६च्या सरासरीने एकूण ९३४ धावा केल्या आहेत, तर टी-ट्वेन्टीमध्ये त्याच्या नावावर २४९ धावा आहेत.