नवी दिल्ली – महिला क्रिकेटचा सचिन तेंडुलकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिताली राज हिने आज सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मिताली भारताकडून २३ वर्ष क्रिकेट खेळात होती. वयाच्या ३९ व्या वर्षी तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा केला.
मितालीने ट्विटरवर एक दीर्घ संदेश जारी करून निवृत्तीची घोषणा केली. तिने लिहिले आहे की, ‘जेव्हा मी निळ्या रंगाची जर्सी घालून माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केले तेव्हा मी लहान होते. हा प्रवास सर्व प्रकारचे क्षण पाहण्यासाठी पुरेसा होता, गेले २३ वर्ष म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण होते. इतर प्रत्येक प्रवासाप्रमाणे हा प्रवासही संपत आहे आणि आज मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे.’
मिताली राजने ७ एकदिवसीय शतके आणि १ कसोटी शतकासह आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवली. तसेच कसोटीमध्ये तिने ४ अर्धशतके झळकावली, तर एकदिवसीय सामन्यांमध्ये ६४ अर्धशतके आणि टी-२० मध्ये १७ अर्धशतके झळकावली. दरम्यान, मिताली राजचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.