हवाना – भारत आणि मॉरिशससारख्या साखर उत्पादनातील प्रमुख देशांपैकी एक असलेल्या क्युबामध्ये साखर निर्यात धोक्यात आली आहे. चालू गळीत हंगामातील अत्यंत खराब उत्पादनामुळे या देशातील साखर उद्योग पुन्हा अडचणीत सापडला आहे. याचा मोठा फटका चीनला बसणार आहे, अशी माहिती क्युबाचे संप्रेषण संचालक डायोनिस पेरेज यांनी दिली आहे.
पेरेज यांनी खास पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, इंधन आणि खतांची कमतरता तसेच साखर कारखान्यांची खराब स्थिती निर्माण झाल्यामुळे क्युबातील ऊस क्षेत्र संकटात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे २० मे रोजी संपलेल्या गळीत हंगामातील ३५ साखर कारखान्यांपैकी केवळ तीन कारखान्यांनी आपले उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्यामुळे क्युबाला साखर निर्यातीच्या आपल्या आंतरराष्ट्रीय करारांची पूर्तता करता येणार नाही. याचा फटका चीनला मोठ्या प्रमाणात बसणार आहे. कारण चीन हा एकमेव असा देश आहे की, जो दरवर्षी ४ लाख टन साखर क्युबाकडून खरेदी करत असतो. यंदा साखरेचे उत्पादन ९ लाख ११ हजार टन इतके होण्याचा अंदाज आहे. त्यापैकी ५ लाख टन साखर देशांतर्गत गरज म्हणून राखीव ठेवली जाणार आहे, तर उर्वरित ४ लाख ११ हजार टन साखर निर्यात करण्याचा प्रस्ताव आहे पण एकट्या चीनचीच दरवर्षीप्रमाणे ४ लाख टनांची मागणी आहे. मात्र ते आता शक्य होणार नसल्याचे डायोनिस पेरेज यांनी म्हटले आहे.