पुणे- भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील विश्रामगृह येथे भेट घेतली. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुण्यातील सर्किट हाऊस येथे आले होते. यावेळी खासदार उदयनराजे त्यांच्याच काही सहकार्यांसोबत अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले. दोन्ही नेत्यांत अर्धा तास चर्चा झाली. उदयनराजे भोसले यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सातार्यातील विकास कामांविषयी आपली अजित पवारांशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवारांसोबत विकास कामांबाबत चर्चा झाली.
विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात अजित पवारांना विनंती केली, असल्याचेही ते म्हणाले. यावेळी उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील घरवापसीविषयी विचारले असता ते म्हणाले की, शिवाजी महाराजांचे जसे सर्वधर्म समभाव हे धोरण होते, तसेच माझेही धोरण सर्व पक्षीय समभाव असे आहे. यावेळी वाईन विक्रीबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, याविषयी लोकशाही व्यवस्थेत निवडून दिलेले प्रतिनिधी उत्तर देतील. राजेशाही असती, तर मी उत्तर दिले असते.
प्रत्येकाचे वैयक्तिक आयुष्य असते. एकदा व्यक्ती सज्ञान झाली की काय करायचे हा निर्णय त्या व्यक्तीने घ्यायचा असतो. वाईन विक्री बंद करा किंवा सुरू ठेवा, लोकांनीच आपल्या शरीराचा वा आरोग्याचा विचार करायला हवा, असे उदयनराजे म्हणाले.