संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

गणेशोत्सवात महाप्रसादावेळी गोळीबार! 5 जण जखमी, 10 जणांना अटक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर – करवीर तालुक्यातील मांढरे येथे गणेशोत्सवाच्या महाप्रसादावेळी मानपानावरुन दोन गटात वाद झाला. जेवणाच्या पंक्तीत मानाने पाणी सोडण्याच्या कारणावरून जोरदार हाणामारी झाली. यावेळी एकाने गोळीबार देखील केल्याने गावात एकच खळबळ उडाली. काठी आणि दगडानेही मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत 5 जण जखमी झाले असून पोलिसांनी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे.

मांढरे गावात हनुमान तरुण मित्र मंडळाकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थ महाप्रसादासाठी आले होते. पहिल्या पंगतीला सुरुवात करण्याआधी अध्यक्षांनी फेटा बांधून पाणी घालण्याची प्रथा आहे. यावेळी अध्यक्षांच्या ऐवजी दुसऱ्याच व्यक्तीने पाणी घातले. यावर एका गटाने आक्षेप घेतल्यानंतर वाद सुरू झाला.यानंतर दोन गटातील काहीजण एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर गावातील प्रमुखांनी सामंजस्याने वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही गटात हाणामारी सुरू झाली. यातच अभिजित सुरेश पाटील यांने बंदुकीतून गोळी झाडली. त्यानंतर काठी आणि दगडाने दोन्ही गटात झालेल्या मारहाणीत ५ जण जखमी झाले. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर करवीर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले.पोलिसांनी 10 जणांना अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami