गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त दुमदुमले शेगाव
शेगाव : श्री गजानन महाराजांच्या 145 व्या प्रकट दिनानिमित्त 13 फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी शेगावमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली होती. प्रकट दिनानिमित्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्यप्रदेश आणि गुजरात इथून देखील पालख्या शेगावात दाखल झाल्या होत्या. हिंदू दिनदर्शिकेनुसार श्री गजानन महाराज प्रकट दिन दरवर्षी माघ कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला साजरा केला जातो.
श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने प्रकट दिन सोहळ्यानिमित्त भाविकांची गर्दी लक्षात घेऊन श्रींचे समाधी दर्शन 24 तास सुरू ठेवण्यात आले आहे. जवळपास एक हजाराच्या वर दिंड्यांचे आगमन झाले. जय गजानन श्री गजानन मुखी हरिनाम घ्यावे, पुढे पाऊल टाकावे वारकरी भक्त मंडळी नाम जप करीत, गण गण गणात बोते मंत्राचा नाम जप, जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल असा श्री नामाचा टाळ मृदुंगाचा गजर करीत जवळपास एक हजारापेक्षा जास्ती भजनी दिंडी संतनगरी दाखल झाले होते.
श्री गजानन महाराज प्रकट दिन हा बुलडाण्यातल्या शेगाव इथे शुभ दिवसाच्या रुपात साजरा केला जातो. या दिवशी शेगाव इथून श्री गजानन महाराजांच्या मंदिरातून पालखी काढली गेली. श्री गजानन महाराजाच्या पादुकांचे पूजन केले गेले. श्री गजानन महाराज प्रकट दिन दरवर्षी माघ कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला किंवा माघ महिन्यातील चंद्रास्त अस्त होत असताना सातव्या दिवशी साजरा केला जातो. शेगावात गणगण गणात बोते चा गजर पाहायला मिळाला. शेगावात पूजा, आरती,अभिषेक, पालखी, पारायण पाहायला मिळाले. हजारो भाविक आपल्या दिंड्या घेऊन शेगावात दाखल झाल्याने शेगावाला एका जत्रेचे रुप आले होते.