मुंबई – संपूर्ण महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेला आणि गरीबांचा बर्गर म्हणून ओळखला जाणारा वडापाव आता महागणार आहे. पावाचे दर वाढल्याने वडापाव महागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.यामुळे वडापावच्या दरात ३ ते ४ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबईकरांचा लोकप्रिय वडापाव लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वानाच जवळचा वाटतो.मध्यमवर्गीय, चाकरमान्यांच्या पोटाला आधार देणाऱ्या वडापावलाही आता महागाईची झळ बसली आहे.दोन-तीन रुपये किमतीपासून सुरु झालेला वडापावचा प्रवास २० रुपयांपार्यंत पोहचला आहे. परंतु,आता पावच्या दरात वाढ झाल्याने वडापाव महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावाचे दर ५० पैशांनी वाढले असून या वर्षातली ही तिसरी वाढ आहे.यामुळे वडापावचे दर ३ ते ४ रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.पाव महागल्यामुळे वडापावसह आता मिसळपाव,पावभाजी यांचे दरही वाढण्याची शक्यता आहे.यामुळे मुंबईकरांचा वडापाव महागल्याने चाकरमानी आणि मध्यमवर्गीयांच्या तोंडाला महागाईचा चटका बसणार आहे.
दरम्यान, याआधीही चणा डाळ व तेलाच्या किंमती वाढल्याने वडापाव महाग झाला होता. वडापाव बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे वडापाव आता असलेल्या किंमतींमध्ये विकणे परवडेनासे झाले आहे. यामुळे वडापावच्या किंमती वाढविण्यात आल्या होत्या.