संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

गर्दीच्या वेळी एसी लोकल नको दिवा, मुंब्रासाठी जादा ट्रेन हव्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

ठाणे – गर्दीच्या वेळी एसी लोकल नको, दिवा आणि मुंब्रा येथून मुंबईसाठी जादा उपनगरी ट्रेन सुरू करा, मोबाईल चोरांवर नजर ठेवून कारवाई करावी, अशा मागण्या उपनगरी रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा समितीच्या बैठकीत केली. त्यामुळे पीक आवरमधील एसी लोकलला प्रवाशांचा विरोध आहे.
मध्य रेल्वेने काही दिवसांपूर्वी एसी लोकलच्या २० फेऱ्या वाढवल्या होत्या. त्यासाठी साध्या लोकलच्या फेऱ्या रद्द केल्या होत्या. याचा फटका सामान्य प्रवाशांना बसला. त्याच्या विरोधात रेल्वे प्रवाशांनी कळवा, मुंब्रा, दिवा बदलापूर या रेल्वे स्थानकांवर आंदोलन केले होते. त्यामुळे रेल्वेने जादा एसी लोकल रद्द केल्या. मात्र आता गर्दीच्या वेळी वातानुकूलित लोकलच नको, अशी भूमिका प्रवासी संघटनांनी घेतली आहे. सुरक्षित प्रवासासाठी उपाययोजना आणि मोबाईल चोरांवर कारवाईची मागणी केली आहे. एसी लोकलमुळे सामान्य प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते, असे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले. दुपारी एसी लोकल चालवण्यास आमची हरकत नसल्याचे ते म्हणाले. गर्दीच्या वेळी मुंब्रा रेल्वे स्थानकात जलद गाड्यांना थांबा द्यावा, दिवा आणि मुंब्रा येथील लोकल फेऱ्या वाढवाव्या, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या या मागण्या प्रशासनाकडे पाठवण्याचे आश्वासन रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिले. दरवाज्यात मोबाईलचा वापर टाळावा, महिलांनी शक्यतो राखीव डब्यातून प्रवास करावा, संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यात त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी बैठकीत केले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami