अहमदनगर – किराणा दुकानातून वाईन विकून शेतकऱ्यांचे हित साधले जात असेल आणि अर्थव्यवस्थेला हातभार लागत असेल तर शेतकर्याला शेतात गांजा लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी अहमदनगर जिल्ह्याच्या मायणी तालुक्यातील आनंदवाडीचे सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल खाडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. यामुळे सरकारला महसूल मिळेल आणि शेतकऱ्याच्या हातातही चार पैसे येतील, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
हाताला काम नाही. शेतीच्या अल्प उत्पन्नात जीवन जगणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी किराणा दुकानात वाईन विकण्याची परवानगी देत असेल आणि त्यातून महसूल मिळत असेल तर सरकारचे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी गांजाचे पीक घेण्याची परवानगी देण्यास काय हरकत आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल आणि त्यांना हमीभाव देण्याचीही सरकारला गरज पडणार नाही, अशा मार्मिक शब्दांत त्यांनी याचे समर्थन केले आहे.