गाझा – पॅलेस्टाइनच्या गाझा पट्टीतील निवासी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना काल रात्री उशिरा घडल्याने एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 7 मुलांचा समावेश आहे. हे सर्व पॅलेस्टाईनचे निर्वासित आहेत. या घटनेमुळे पॅलेस्टाइनमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
आग लागल्यानंतर इमारतीतील लोकांना श्वासनाचा त्रास झाला. लोकांना या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि लगेच आजूबाजूचा परिसर सील केला. आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे एक तास लागला. इमारतीत राहणाऱ्या बहुतांश लोकांना बाहेर काढण्यात आले आणि जखमींना रुग्णालायात दाखल केले. पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी या घटनेला राष्ट्रीय शोकांतिका म्हटले आहे. एक दिवसाचा दुखवटाही जाहीर करण्यात आला आहे.