संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

गिरीश बापट यांच्या तब्येतीची शरद पवारांकडून स्नेहभेट अन् विचारपूस

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे :कशी आहे तब्येत आता? बरी आहे साहेब! असा संवाद राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्यात झाला. राजकीय आरोप-प्रत्यारोप बाजूला सारत एक ‘स्नेह’भेट आणि प्रेमळ संवाद या दोघांमध्ये पहायला मिळाला. पुण्यात एका कार्यक्रमांत दोघांमध्ये झालेली ही भेट आपुलकीची आणि प्रेमळ संवादाची असल्याने उपस्थितीतांनाही हा संवाद भावला असल्याची चर्चा सध्या होत असल्याचे पहायला मिळते.
गेल्या अनेक दिवसांपासून दुर्धर आजाराशी सामना करणाऱ्या पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या तब्येतीची विचारपूस ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. नुकतेच पुणे दौऱ्यावर असणाऱ्या शरद पवार आणि गिरीश बापट यांची भेट झाली. यावेळी बापट यांचे जवळचे मित्र राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे देखील उपस्थित होते. शरद पवार यांनी बापटांशी हस्तांदोलन करुन त्यांच्या तब्येतीची आपुलकीने विचारपूस केली. पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या रौप्यमहोत्सव वर्षानिमित्त आयोजित विश्वस्त परिषदेला पुण्यात खासदार गिरीश बापट आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार दोघेही उपस्थित होते. यावेळी बापटांना पाहताच शरद पवार यांनी गिरीशजी तब्येत काय म्हणतेय, बरी आहे का सध्या? अशी आपुलकीने विचारपूस केली.
गिरीश बापट पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. गिरीश बापट यांचे सर्वपक्षीय संबंध आहेत. शरद पवार यांच्या कामाविषयी बापट संधी मिळेल तेव्हा कौतुक करत असतात. त्यात पुणे जिल्ह्यात पवारांचे वर्चस्व आहे. बापट यांनी देखील आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे पवार आणि बापट यांच्यातील संबंध पूर्वीपासूनच चांगले असल्याची चर्चा देखील अनेकदा पुण्याच्या राजकीय वर्तुळातही होत असते.त्यामुळे आताही बापट आणि पवार यांची झालेली स्नेह भेट आणि विचारपूस करताना झालेला आपुलकीचा संवाद येथील उपस्थितांनाही भावला असल्याचेच चित्र स्पष्ट झाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami