कॅलीफोर्निया : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये ‘पद्म भूषण’ प्रदान करण्यात आला. भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू यांच्या हस्ते पिचाई यांना भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला व्यापार आणि उद्योग प्रकारात २०२२ या वर्षासाठी पिचाई यांना या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मूळचे भारतीय असलेले सुंदर पिचई इतकी वर्षे अमेरिकेत राहिल्यानंतर आता अमेरिकेचे नागरिक बनले आहेत. तामीळनाडूतील मदुराई ते गुगलचे कार्यालय असलेल्या माउंटेन व्यूपर्यंतचा त्यांचा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे म्हणत भारताकडून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी पिचाई म्हणाले की, सर्वोच्च पुरस्काराबद्दल मी भारत सरकार आणि भारतीय जनतेचा आभारी आहे. भारत हा माझाच एक भाग आहे. तंत्रज्ञानाचा लाभासाठी आम्ही एकत्र काम करत असताना गुगल आणि भारत यांच्यातील भागीदारी अशीच सुरू ठेवण्यासाठी मी उत्सुक आहे. भारत हा माझाच एक भाग आहे आणि मी जिथे जिथे जातो तिथे तो माझ्यासोबत घेऊन जातो, असे पिचाई म्हणाले. याशिवाय आता भारत-अमेरिका आर्थिक आणि तंत्रज्ञानातील संबंधांना बळकटी मिळणार असल्याचे, तरणजीत संधू यांनी सांगितले.