मुंबई – इंटरनेटच्या या जगात फसवणुकीचे प्रमाण सातत्याने वाढत असून आता आणखी एका नव्या धोक्याची माहिती समोर आली आहे. सरकारच्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडून गुगल क्रोमबाबत एक सूचना जारी करण्यात आली आहे. तुमच्या लॅपटॉप किंवा डेकस्टॉपमध्ये असणारा गुगल क्रोम अपडेट करून घ्या, अशी ही सूचना आहे. टीमच्या म्हणण्यानुसार, गुगल क्रोमच्या जुन्या व्हर्जनमध्ये काही कमतरता आहेत. त्यामुळे तुमचा संगणक हॅक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ताबडतोब नवे व्हर्जन डाऊनलोड करून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या व्हर्जनमध्ये सुरक्षिततेबाबतच्या जुन्या त्रुटी दूर करण्यासह अनेक नवीन फिचर्सही देण्यात आले आहेत. दरम्यान, भारतात अनेकजण गुगल क्रोम वापरतात. सोशल मीडियावर सर्फिंग करण्यापासून ते अनेक कार्यालयीन कामांसाठी गुगल क्रोमचा वापर केला जातो.