मुंबई : बोरीवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आज सिंहांची जोडी दाखल झाली आहे. आज दुपारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सिंहाची जोडी नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आली. डॉक्टरांच्या देखरेखीखाली काही दिवस ह्या सिंहांना ठेवण्यात आले होते.त्यानंतर मुंबईकरांना नॅशनल पार्कमध्ये आता सिंह सफारीचा आनंद घेता येणार आहे.
सिंहांची जोडी काही दिवसांपूर्वी गुजरातेतील सक्करबाग प्राणी संग्रहालयातून मुंबईत दाखल झाली. हे दोन्ही सिंह प्रत्येकी दोन वर्षे वयाचे आहेत. आता मुंबईतील वातावरणाची पुरेशी सवय झाल्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात त्यांना सोडण्यात आले आहे. हे सिंह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाल्याने येथील बंद पडलेली सिंह सफारी पुन्हा सुरू होणार आहे.ही सिंहांची जोडी अवघ्या दोन वर्षांची असल्याने पुढील अनेक वर्षे सिंह सफारीचा आनंद पर्यटकांना घेता येईल तसेच या सिंहांच्या पुढच्या पिढ्याही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात निर्माण होतील, असा विश्वास वन मंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.सिंह सफारीमुळे उद्यानाच्या महसूलात मोठी वाढ होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान,याआधी गुजरातमधील सक्करबाग प्राणिसंग्रहालयातील सिंहाची जोडी तब्बल १२ तास प्रवास करून सिंहाची जोडी राष्ट्रीय उद्यानात पोहोचली. सिंहांच्या बदल्यात राष्ट्रीय उद्यानातील ‘बजरंग’ आणि ‘दुर्गा’ ही वाघांची जोडी सक्करबाग प्राणिसंग्रहालयाला पाठवण्यात आली होती.