अहमदाबाद – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसला. हार्दिक पटेलनंतर काँग्रेसच्या युवा महिला चेहरा असलेल्या श्वेता ब्रह्मभट्ट यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाचे सुरेश पटेल यांचा पराभव केला होता.
पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला रामराम करून भाजपामध्ये प्रवेश केला. या धक्क्यातून गुजरात काँग्रेस सावरण्यापूर्वीच श्वेता ब्रह्मभट्ट यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केला. यामुळे हार्दिक पटेल कामाला लागले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपा पक्ष प्रवेशाच्या वेळी त्यांनी दर १० दिवसांनी पक्ष प्रवेशाचा एक कार्यक्रम करू, असे सांगितले होते. गुजरात काँग्रेसमध्ये दूरदृष्टीचा अभाव आहे. काम करणाऱ्या नेत्यांना काम करू दिले जात नाही. आम्ही काँग्रेसवर टीका करत नाही. आमच्या सूचनांचा विचार केला असता तर पक्षालाच फायदा झाला असता, असे भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर श्वेता ब्रह्मभट्ट यांनी सांगितले. हार्दिक पटेल यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या आमदार आणि नेत्यांना भाजपामध्ये आणणार असल्याचे सांगितले होते. दर १० दिवसांनी असा एक कार्यक्रम करू, असे ते म्हणाले होते. त्यानंतर ब्रह्मभट्ट यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे हार्दिक पटेल कामाला लागले, अशी चर्चा सुरू झाली आहे.