अहमदाबाद – हिमाचल प्रदेशची निवडणूक पार पडताच गुजरात विधानसभेची रणधुमाळी आता रंगणार असून त्यासाठी मैदानातील तिन्ही राजकीय प्रमुख पक्ष सरसावले आहेत.राज्यात प्रचाराचा धुरळा उडवण्यासाठी जास्तीत जास्त सभा सर्वच प्रमुख नेते घेणार असून त्यासाठी तब्ब्ल ९ जेट विमाने आणि ६ हेलिकॉप्टर्स भाजप, काँग्रेस व आम आदमी पक्षाने बूक केली आहेत.यासाठी अंदाजे १०० कोटी रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले जात आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासूनच भाजप,काँग्रेस आणि ‘आप’ या तिन्ही पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला होताच. त्यातच आधी हिमाचल प्रदेशात निवडणूक होत असल्याने बड्या नेत्यांना तिकडेही ये-जा करावी लागत होती.आता शनिवारी हिमाचलचे मतदान पार पडल्यानंतर प्रचाराचा खरा धुरळा गुजरातमध्ये पाहता येणार आहे.राज्यात जास्तीत जास्त सभा, रोड शो, बैठका घेऊन राज्य पिंजून काढण्यासाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. त्यासाठी वेगवान दळणवळण हवे असल्याने हवाई सुविधेवर हे पक्ष खर्च करत आहेत.
अहमदाबाद,दिल्ली आणि मुंबई येथील खासगी विमान कंपन्यांकडे भाजप आणि काँग्रेसने जेट विमाने, टर्बोक्रॉप इंजिन असलेली विमाने,तसेच हेलिकॉप्टर तब्बल २५ दिवसांसाठी बूक करून ठेवले आहेत.एकूण ९ विमाने व ६ हेलिकॉप्टरचे बुकिंग निश्चित झाले असून, ऐनवेळी त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.ही जेट व हेलिकॉप्टर भाडेतत्त्वावर घेण्यात आली असून,त्यांचा खर्चही प्रचंड आहे.या जेट विमानाचे दरतासाचे भाडे २ ते ४ लाख रुपये आहे,तर टर्बोक्रॉप प्रकारातील विमानांचे भाडे प्रतितास१ लाख ४० हजार हजार रुपये आहे. हेलिकॉप्टरचे भाडे तीन ते पावणेचार लाख रुपये प्रतितास आहे. याशिवाय एका फ्लाईटसाठी विमानतळ शुल्क,लाऊंज शुल्क यापोटी किमान ३० हजार रुपये खर्च येणार आहे.तसेच राजकीय पक्षांना आणखी विमाने व हेलिकॉप्टर लागल्यास अतिरिक्त शुल्कासह ती उपलब्ध करून घ्यावी लागणार आहेत.या एकंदर हवाई फेर्यांसाठी एकूण १०० कोटी रुपयांच्या आसपास खर्च येण्याची शक्यता आहे.