मुंबई – गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जलमार्गावर एक प्रवासी चालत्या बोटीतून तोल जावून समुद्रात पडला. सुदैवाने त्याला पोहता येत असल्याने तो बचावला. हा प्रवासी समुद्रामध्ये पडल्याचे लक्षात येताच या बोटीवर गोंधळ उडाला होता. मात्र बोटीवरील लोकांनी प्रसंगावधान दाखवत या तरुणाला तातडीने बोटीमध्ये परत ओढून घेतले. प्रशांत कांबळे असं या प्रवाशाचे नाव आहे. या घटनेनंतर जलमार्गावरील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
आज सकाळी मांडवा जेटीपासून काही अंतरावर ही घटना घडली. सकाळी सव्वानऊ वाजता गेट वे ऑफ इंडिया वरून सुटलेली अजंठा कंपनीची अल नुर ही बोट मांडवा बंदराकडे निघाली. बोट मांडवा जेटीजवळ आली असता प्रशांत कांबळेचा तोल जाऊन तो समुद्रात पडला. यावेळी प्रशांतच्या पाठीवर बॅग होती. प्रशांत समुद्रात पडल्यानंतर या बोटीवरील प्रवाशांनी एकच आरडाओरड सुरु केला. या गोंधळामुळे प्रशांत पडलेल्या ठिकाणापासून बोट दूर जाण्याआधीच थांबवण्यात आली. बोटीवरील कर्मचार्यांनी त्याला दोरीच्या सहायाने पुन्हा सुखरूप बोटीत घेतले. हे प्रकरण पोलिसात गेले मात्र यात आपली चूक असल्याचे प्रशांतने मान्य केले.