मुंबई – गोयल दाम्पत्य मनी लॉडिंगप्रकरणी मूळ गुन्हाच अस्तित्त्वात नसेल तर त्याआधारे ईडीतर्फे नोंदवण्यात येणारी तक्रार (ईसीआयआर )कशी कायम राहू शकत नसल्याचे मुंबई हायकोर्टाने गुरुवारी स्पष्ट केले. त्यामुळे जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता यांच्या विरोधात ईडीने नोंदवलेली तक्रार रद्द केली. त्यामुळे गोयल दाम्पत्याला आता दिलासा मिळाला आहे.
मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द झाल्याने ईडीचे प्रकरण टिकू शकत नाही. त्यामुळे ईडीने दाखल केलेला तक्रार आणि त्याआधारे सुरू केलेली कारवाई बेकायदा आणि कायद्याशी विसंगत असल्याचा दावा गोयल दाम्पत्याने केला होता. या दाम्पत्याने ईडीने दाखल केलेले प्रकरण रद्द करण्याची मागणी केली होती.
‘ईसीआयआर वैधानिक नव्हे, तर खासगी कागदपत्र आहे. त्यामुळे तो रद्द करता येऊ शकत नाही, असा दावा ईडीने मागील सुनावणीच्या वेळी केला होता. ‘मूळ गुन्हा रद्द झाला किंवा अस्तित्त्वात नसेल तर ईडीने नोंदवलेला ईसीआयआर रद्द का होऊ शकत नाही ? मूळ गुन्ह्याशिवाय ईसीआयआर कसा काय टिकेल ?
असा प्रश्नही न्यायालयाने ईडीला केला होता आणि ईडीला याप्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी गुरुवारी झालेल्या सुनावणीत मूळ गुन्हा बंद करण्याबाबतचा अहवाल न्यायालयाने स्वीकारला. त्यामुळे ईडीने दाखल केलेला ईसीआयआर टिकत नाही हे मान्य केले आणि ईडीने गोयलांच्या प्रकरणातही आता काहीच उरलेले नसल्याचेही हायकोर्टाला सांगितले. ईडीच्या या वक्तव्यानंतर न्यायमूर्ती डेरे आणि न्यायमूर्ती चव्हाण यांच्या खंडपीठाने गोयल दाम्पत्याविरोधातील ईडीचे प्रकरण रद्द केले.