मुंबई – राज्यात सध्या गोवरची साथ वेगाने पसरत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यामध्ये दोन टप्प्यांत लसीकरण करण्यात येणार आहे. नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील एकही लशीची मात्रा न घेतलेल्या बालकांच्या लसीकरणावर भर देताना हे अभियान दोन टप्प्यांत राबवण्यात येणार आहे.
१५ ते ३० डिसेंबपर्यंत बालकांना पहिली मात्रा तर १५ ते २६ जानेवारीपर्यंत बालकांना लशीची दुसरी मात्रा देण्यात येणार असल्याची माहिती राज्य कृतिदलाचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके यांनी दिली. राज्यातील सर्व बालकांचे २६ जानेवारीपर्यंत लसीकरण करण्याचा निर्धार राज्य कृतिदलाने केला आहे. त्यानुसार कृतिदलाने आराखडा तयार केला आहे. कृतिदलाने केलेल्या शिफारशीनुसार राज्यात गोवर-रुबेलासाठी विशेष लसीकरण अभियान राबवण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.
गोवरचा संसर्ग थांबविण्यासाठी सर्वप्रथम ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यात यावे. लसीकरण पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करावी. लसीकरणासाठी लागणारी यंत्रणा, लसीच्या मात्रा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रुग्ण आढळलेल्या भागात अतिरिक्त मात्रा नऊ महिने ते पाच वर्षांच्या बालकांना देण्यात याव्यात, असे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले आहे.
गोवर संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम आरोग्य यंत्रणांना देण्यात आला आहे. दहा कलमी कार्यक्रमा अंतर्गत ताप-पुरळ रुग्णाचे गतिमान सर्वेक्षण करणे, राज्यातील गोवर हॉट स्पॉटचा शोध, उद्रेक स्थळे, लसीकरण कमी असणारे भाग, दाट लोकवस्तीचे भाग, कुपोषण अधिक असणारे भाग या क्षेत्रावर विशेष भर दिला जाणार आहे.