मडगाव – गोवा राज्यातील अनेक भागात आग लागण्याच्या घटना सुरूच आहेत. नऊ दिवसांपूर्वी सत्तरीच्या साट्रे परिसरात लागलेली आग पसरत असून वनखात्याच्या आठ डोंगरमाथ्यावर आगीचे तांडव कायम आहे.त्यामध्ये घोगळ आणि धर्मापूरसह फातोर्डे,मडगाव येथील टेकड्यांचा समावेश आहे.दुसरीकडे वनखाते नौदल आणि वायुदलाच्या प्रयत्नांना काहीसे यश आला असून १६ ठिकाणच्या आग विझविल्याचा वनखात्याचा दावा आहे.
घोगळ हाऊसिंग बोर्ड परिसरातील टेकडीवर लागलेली आग दिवसभर धुमसत होती.ही आग नक्की कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. अग्निशामक दलाला टेकडीवर पाणी मारण्यासाठी मार्ग सापडत नव्हता. येथील शेतकरी वालेंतिनो रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, शेतातून घराकडे जात असताना धूर दिसू लागल्याने घोगळ परिसरात गेल्यावर आग लागल्याचे कळले. आग लागलेल्या ठिकाणाच्या एका बाजूला असलेल्या सोनसडो प्रकल्प तर दुसऱ्या बाजूला मायना परिसरातील भागात आग पसरण्याची शक्यता होती तसेच धर्मापूर येथील डोंगर परिसरात शुक्रवारी रात्री पुन्हा आग दिसून आली होती. त्यानंतर दोन दिवसांत नावेलीनजीकच्या भागातील धर्मापूर सालझोरा परिसरातील डोंगरांवर आग लागण्याची घटना घडली. डोंगरमय भागात गाडी जात नाही. सालझोरा परिसरातील डोंगर भागात काही ठिकाणी अजूनही आग धुमसत असल्याची माहिती आमदार क्रुझ सिल्वा यांनी दिली.