संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची सरशी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर झालेल्या 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींसाठी काल मतदान झाले. आज या मतदानाचा निकाल हाती आला आहे. या निकालातून भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दुसरे स्थानकायम ठेवले असून त्यानंतर ठाकरे गट, काँग्रेस आणि सर्वात शेवटच्या पाचव्या स्थानी शिंदे गट आहे. भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडीत यावेळी काटे की टक्कर दिसून आली.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसल्याचे दिसून आले आहे. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर होत असलेल्या या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतात याबाबत सर्वांना उत्सुकता होती. थेट जनतेमधून सरपंच निवडला जाणार या पद्धतीने या निवडणुका पार पडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चौथ्या स्थानावर फेकला गेला याबाबत अजित पवार यांना विचारले असता अजित पवार म्हणाले की, माझं तर म्हणणं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांना चिन्हाचं वाटप होतं. तर ग्रामपंचायतीला पण चिन्हावर निवडणुका झाल्या पाहिजेत. म्हणजे स्पष्ट

चित्र कळेल. आम्ही पण म्हणतो आमच्या जास्त आल्या. भाजपा म्हणते आमच्या जास्त जागा आल्या. शिवसेना म्हणते आमच्या जास्त जागा आल्या. काँग्रेस म्हणते आमच्या जास्त आल्या. मी 32 वर्षे झालं राजकारण, समाजकारण करतो. ग्रामपंचायतींमध्ये मतदान हे पक्ष पाहून नाही तर उमेदवारांच्या आधारे होत असल्याचं सूचक विधान केलं. या निवडणुकांमध्ये 74 टक्के मतदान झाले होते. 1 हजार 165 ग्रामपंचायतींचा निकाल हाती आला. त्यामध्ये प्रथम स्थानी 239 जागांवर भाजपा, 113 ग्रामपंचायतींमध्ये शिंदे गट, 153 ग्रामपंचायतींमध्ये ठाकरे गट, काँग्रेसने 143 तर राष्ट्रवादी काँग्रेसने 155 तर इतर 295 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे.
मोरगिरीत राष्ट्रवादीचा
प्रथमच पराभव

राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाकडून सातारच्या मोरगिरी ग्रामपंचायत शंभूराज देसाई गटाने खेचून घेत विजय मिळवला.
बाहुली बुद्रुक
पुन्हा मनसेकडे

नाशिकच्या बाहुली बुद्रुक या ग्रामपंचायतीची स्थापना झाली तेव्हापासून ही ग्रामपंचायत मनसेकडे आहे. आताही या ग्रामपंचायतीत मनसेचा विजय झाला.
राजन साळवींनी
वर्चस्व राखले

रत्नागिरीतील राजापूर ग्रामपंचायतीत ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचे वर्चस्व असून दहा पैकी सात जागा त्यांनी जिंकल्या. भाजपाने एक ग्रामपंचायत जिंकली. उदय सामंतांच्या प्रतिष्ठेच्या शिरगाव ग्रामपंचायतीत शिंदे गट विजयी झाला असला तरी सरपंच पदावर मविआने विजय मिळवला. रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाकडे 9, शिंदे गटाकडे 2 ग्रामपंचायती गेल्या.
नंदुरबारमध्ये पुन्हा
चित्र पालटले

नंदुरबारमध्ये यावेळी पुन्हा चित्र पालटून भाजपने वर्चस्व मिळवले आहे. भाजपा 9, काँग्रेस 7, राष्ट्रवादी 1, ठाकरे गट 1, शिंदे गट 2 असा विजय प्राप्त झाला.
चिखली ग्रामपंचायतीत
ईश्वरी चिठ्ठी

नवापूरच्या चिखली ग्रामपंचायतीत ईश्वरी चिठ्ठीने सरपंचाची निवड झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
चंद्रपुरात समानता
चंद्रपुरात भाजपा आणि काँग्रेसला 9 असा समान विजय प्राप्त झाला.
पालघरमध्ये राष्ट्रवादी
पालघरमध्ये राष्ट्रवादी 4, भाजपा 2 आणि ठाकरे गटाला 1 ग्रामपंचायत मिळाली असून, राष्ट्रवादीने मुसंडी मारली आहे.
भास्कर जाधवांनी
वर्चस्व राखले

गुहागरमध्ये ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आपले वर्चस्व राखत दोन्ही ग्रामपंचायतीत ठाकरे गटाला विजयी केले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला.
कोल्हापुरातील 7 पैकी
4 ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे

कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाचं खातं उघडलं. भूदरगडच्या फये गावात विजय मिळवला. 7 ग्रामपंचायतींपैकी 4 राष्ट्रवादी काँग्रेसकडे, तर 3 शिंदे आणि भाजपाकडे ग्रामपंचायती आल्या आहेत.
वाहोली ग्रामपंचायतीला
20 वर्षांनंतर सरपंच मिळाला

कल्याण तालुक्यातील वाहोली ग्रामपंचायतला अखेर वीस वर्षांनंतर सरपंच मिळाला आहे. सरपंचपदी शाहीम सरवले हे विजय झाले आहेत. या गावात जनगणनेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने गावकर्‍यांनी 20 वर्षे मतदानावर बहिष्कार टाकला होता. अखेर सर्व गावकर्‍यांनी एकत्र येत ग्रामविकास या पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात निवडणुका लढवल्या. एकूण सात सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत पाच सदस्य बिनविरोध निवडून आले तर दोन जागी निवडणुका पार पाडल्या. आता या ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता आल्याची चर्चा सुरू आहे. वीस वर्षे रखडलेल्या विकासाला चालना देणार असल्याचे सरपंच शाहीम यांनी सांगितले.
वांगणी ग्रामपंचायतीवर
ग्रामविकास आघाडीचं वर्चस्व

अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतीवर भाजप शिंदे गटाच्या ग्रामविकास आघाडीचं वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. 17 पैकी 12 जागांवर ग्रामविकास युतीचे उमेदवार विजयी तर शिंदे गटातल्याच वामन म्हात्रे प्रणित दुसर्‍या गटाने चार जागा जिंकल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला फक्त एक जागा तर काँग्रेस राष्ट्रवादीला खातं उघडण्यातही अपयश
आले आहे.
पेठ तालुक्यात शिंदेच्या
गटाला एकही जागा नाही

ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर झाले. या निकालानंतर नाशिकमध्ये भाजपआणि एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला जबर धक्का बसला आहे. नाशिकच्या पेठ तालुक्यामध्ये भाजप आणि शिंदेंच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. पेठ तालुक्यामध्ये एकूण 71 ग्रामपंचायती आहेत. यातल्या 69 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्या. तर दोन ठिकाणचे निकाल बिनविरोध लागले. तालुक्यात 29 ग्रामपंचायतींवर अपक्ष, 23 ठिकाणी राष्ट्रवादी, 17 ठिकाणी शिवसेना ठाकरे गट, 1 ठिकाणी काँग्रेस आणि एका ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विजय झाला.
शहापूरमध्ये 30 ग्रामपंचायतींवर उद्धव ठाकरेंचा भगवा
तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 72 ग्रामपंचायतींची निवडणूक काल रविवारी पार पडली. आज निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, शिवसेनेच्या ठाकरे गटांनी तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींवर आपला भगवा फडकवला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 30 तर महाविकास आघाडीच्या 21 अशा एकूण 51 ग्रामपंचायतींवर शिवसेनेने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे, अशी माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख कुलदीप धानके व तालुका सचिव रविंद्र लकडे यांनी दिली. विजयी उमेदवारांनी शिवसेना झिंदाबाद… उद्धव ठाकरे आगे बढो…. आदित्य ठाकरे आगे बढो…अशी घोषणाबाजी
करत होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami