नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षाला धारेवर धरलं आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेसवर टीका केली. आजही त्यांनी काँग्रेसच्या घराणेशाहीला विरोध केला. ते एएनआय वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.
मोदी म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये दोन पक्ष आहेत. पंजाबमध्ये कुटुंबाचा पक्ष आहे, हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड, तामिळनाडूमध्ये एका कुटुंबाशी संबंधित पक्ष आहेत. हा लोकशाहीला सर्वात मोठा धोका आहे. कुटुंबांशी संबंधित पक्ष लोकशाहीच्या मूलभूत तत्वाच्याच विरोधात असतात. कुटुंबाला वाचवा, देश वाचला-न-वाचला, फरक पडत नाही. घराणेशाहीत काय होतं, मुलगा कसाही असो, तोच पुढचा अध्यक्ष होईल. अशा वेळी सर्वात मोठं नुकसान टॅलेंटचं होतं. असे पक्ष नव्या तरुणांना राजकारणात येण्यापासून रोखतात. एखाद्या तरुणाला भाजपामध्ये जायचं नसेल, तर त्याच्यासमोर दुसरा कुठला पर्यायच नाहीये. तरुण सार्वजनिक जीवनात येण्यापासून घाबरत आहेत.
दरम्यान, लोकसभा आणि राज्यसभेच्या भाषणात मोदी काँग्रेसवर एवढे का बोलले यावर त्यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, देशाची आज जी परिस्थिती आहे, त्यात सर्वात महत्त्वाची विचारसरणी काँग्रेसची राहिली आहे. आजपर्यंत देशाच्या पंतप्रधानांपैकी मी आणि अटल बिहारी वाजपेयी सोडून सगळे पंतप्रधान काँग्रेस विचारसरणीचेच मिळाले आहेत. हीच घराणेशाही देशात राहिली, तर देशाचं किती मोठं नुकसान होईल. काँग्रेसमुक्त भारत असं जेव्हा मी म्हणतो, तेव्हा मला संख्येविषयी बोलायचं नसतं. काँग्रेसने राजकारणात चारित्र्याची विशिष्ट पद्धती रुजवली आहे, ती देशासाठी घातक आहे. काँग्रेसनं चांगल्या पद्धतीनं काम केलं असतं, तर देश कुठल्या कुठे पुढे गेला असता.