लोको पायलटच्या सतर्कतेने अनर्थ टळला
नेरळ – पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये घातपाताचा प्रकार उघडकीस आला. अज्ञात व्यक्तीने माथेरान-नेरळ मिनी ट्रेनच्या घाट मार्गातील रुळावर रेल्वेच्या लोखंडी स्लीपरचा तुकडा ठेवला होता. हा प्रकार मिनी ट्रेनचा लोको पायलट दिनेश चंद मीना यांच्या लक्षात आल्यामुळे प्रसंगावधान राखून त्यांनी गाडी थांबवली. स्लीपरचा तुकडा बाजूला केला. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला. सध्या दिवाळीची सुट्टी असल्यामुळे माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली आहे. असे रविवारी घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. रेल्वे याची चौकशी करत आहे.
कोरोनाचे निर्बंध, पावसामुळे नेरळ-माथेरान मार्गाचे झालेले नुकसान. आदी कारणांमुळे ३ वर्षांपासून नेरळ- माथेरान मिनी ट्रेन बंद होती. गेल्या २२ ऑक्टोंबरपासून ती पुन्हा सुरू झाली. दिवसभरात तिच्या अप-डाऊन अशा ४ फेऱ्या होतात. नेरळ ते माथेरानबरोबरच अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवाही सुरू आहे. ६ डब्यांच्या तीन मिनी ट्रेन डिझेल इंजिनवर चालवल्या जातात. दिवाळीची सुट्टी असल्यामुळे माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली आहे. असे असताना रविवारी सायंकाळी ५ वाजता अज्ञात व्यक्तीने मिनी ट्रेनच्या मार्गावर घाटात लोखंडी स्लीपरचा तुकडा ठेवला होता. हा प्रकार लोको पायलटच्या लक्षात आला. त्यामुळे त्यांनी गाडी थांबवून तो बाजूला हटवल्याने संभाव्य मोठा अनर्थ टाळला. या घटनेच्या चौकशीचे आदेश रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.