बंगळुरू – घुंगट, बांगड्या, पगडी, क्रॉस, टिकली अशी धार्मिक प्रतिके दररोज शाळा-कॉलेजांमध्ये परिधान केलेली चालतात. मग केवळ हिजाबलाच विरोध का? असा सवाल मुस्लिम विद्यार्थिनींच्या वतीने ॲडव्होकेट रवी कुमार यांनी बुधवारी कर्नाटक उच्च न्यायालयाला विचारला. उडुपी कॉलेजमधील हिजाब वादानंतर या प्रकरणी मुस्लिम मुलींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर बुधवारी सलग चौथ्या दिवशी सुनावणी झाली.
कर्नाटकच्या उडुपी कॉलेजमध्ये हिजाब वादाची सुरुवात झाली. त्याचे लोण संपूर्ण राज्यात पसरले. महाराष्ट्र, दिल्ली आणि इतर राज्यांमध्येही त्याचे पडसाद उमटले. त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कर्नाटक सरकारने राज्यातील शाळा-कॉलेजांना सुट्टी जाहीर केली होती. आता शाळा, कॉलेज सुरू असली तरी न्यायालयात हा वाद सुरू आहे. त्यावर दाखल झालेल्या याचिकेवर युक्तिवाद करताना घुंगट, बांगड्या, पगडी, क्रॉस आदी धार्मिक प्रतिके चालतात. मग केवळ हिजाबलाच विरोध कशासाठी, असा सवाल मुस्लिम मुलींच्या वतीने उच्च न्यायालयात उपस्थित केला. शाळा-कॉलेजमध्ये या सर्व गोष्टी चालतात. मग मुस्लीम मुलींनाच हिजाबवरून का लक्ष्य केले जाते. हिजाब परिधान करणाऱ्या मुस्लिम मुलींना कॉलेजात प्रवेश नाकारणे म्हणजे घटनेने दिलेला हक्क नाकारल्यासारखे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.