*१७०० हून अधिक लोक अडकले
वॉशिंग्टन: अमेरिकेतील उत्तर कॅलिफोर्नियामध्ये चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसाचा तडाख्यामुळे येथील पाजारो नदीचा बांध फुटला असून, आजूबाजूचा परिसर पुराच्या पाण्याखाली आला आहे. पजारो नदीवर बांधण्यात आलेले हे धरण सुमारे १०० फूट रुंद होते. शनिवारी पहाटे मुसळधार पावसाने हे धरण फुटल्याने परिसरात पाणी साचले. अद्याप १७००हून अधिक लोक येथे अडकले आहेत. ५० हून अधिक लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
हवामान केंद्राने इशारा दिल्यानंतर आणि परिस्थतीचे गांभीर्य लक्षात घेऊन सेंट्रल कोस्टच्या मॉन्टेरी काउंटीमध्ये ८,०००हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. बचाव कार्य सुरु आहे. येथे अडकलेल्यांमध्ये स्ट्रॉबेरीची मोठ्या प्रमाणात शेती करणारा उत्तर कॅलिफोर्नियातील शेतकरी वर्ग आहे. आतापर्यंत कॅलिफोर्नियाच्या मध्यवर्ती किनार्यावरील पाजारोच्या अनकॉर्पोरेटेड मॉन्टेरी शहरातुन ५० हून अधिक लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. हे धरण फुटल्याने येथील परिस्थिती गंभीर झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न असल्याचे मॉन्टेरी काउंटी बोर्ड ऑफचे अध्यक्ष लुईस अलेजो यांनी ट्विट केले आहे. मात्र हा पूर भयानक असल्याचे वर्णन देखील त्यांनी केले आहे. यात लॅटिनो शेतमजूरांचे बरेच नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. ही परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी दोन महिन्यांहून अधिक काळ लागेल असे अलेजो यांनी स्पष्ट केले आहे.