मुंबई – शिवसेना नक्की कोणाची? हा प्रश्न सध्या सर्वसामान्यांपासून अगदी मोठमोठ्या उद्योगपतींना पडला आहे. मुख्यमंत्री एकनाथांच्या शिंदे गटाने शिवसेनेत केवळ ऐतिहासिक बंड केला नाही, तर आम्हीच खरी शिवसेना असल्याचे सांगत धनुष्यबाणावर आपला हक्क सांगितला. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर जणू सध्या अस्तित्त्वाची लढाई उभी ठाकली आहे. अशातच अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांचे एक ट्विट प्रचंड चर्चेत आले आहे. राज्यात सुरू असलेल्या सर्व राजकीय घडामोडींना एक वेगळे वळण देणारे हे ट्विट आहे. यात ‘उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरे वाटले’, असे दीपाली सय्यद यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता या नेत्यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले असून शब्दांच्या ‘बाणाने’ कोण कोणाला घायाळ करणार की, पुन्हा शिवसेना भाजपासंगे एकत्र नांदणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दीपाली सय्यद यांनी शनिवारी रात्री ट्विट करून म्हटले, ‘येत्या दोन दिवसात आदरणीय उद्धव साहेब व आदरणीय शिंदे साहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरे वाटले. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखांची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहे. या मध्यस्तीकरीता भाजपा नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद! चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल.’
दरम्यान, या ट्विटनंतर लवकरच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे भेटणार हे निश्चित झाले आहे. मात्र बंडाला महिनाही उलटलेला नसताना तापलेल्या वातावरणात चर्चेचा मुहूर्त निघाला, हे जरा पचेनासे झाले असून यामुळे आपले नेते आपल्याच डोळ्यात धूळ तर फेकत नाहीत ना, अशी शंका सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. आता या चर्चेतून ठाकरेंची शिवसेना शिंदे गटाला पोटात घेणार की दूर करणार, याकडे लक्ष असेल.
@OfficeofUT
— Deepali Sayed (@deepalisayed) July 16, 2022
@mieknathshinde
@TawdeVinod
@Pankajamunde pic.twitter.com/20JnC3QSma