मुंबई – पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्नी रोड रेल्वे स्थानकात बांधण्यात आलेला नवीन पादचारी पूल आता कार्यान्वित झाला असून हा प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे आता पश्चिम रेल्वे मार्गावरील पादचारी पुलांची संख्या १४६ झाली आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या पश्चिम रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, चर्नी रोड स्थानकातील हा नवीन पादचारी पूल ३८.३ मीटर लांबीचा आणि ६ मीटर रुंदीचा आहे. हा पूल फलाट क्रमांक १ आणि ४ ला पूर्वेला असलेल्या स्कायवॉकशी जोडला गेला आहे.या स्थानकातील जुना पादचारी पूल ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रवाशांसाठी बंद करून २४ फेब्रुवारी २०२२ रोजी पाडण्यात आला होता. तो नव्याने बांधुन काल सोमवारी प्रवाशांच्या सेवेसाठी प्रत्यक्ष उपलब्ध करून देण्यात आला. गेल्यावर्षी पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते डहाणू रोड दरम्यान १३ पादचारी पूल प्रवाशांसाठी प्रत्यक्ष खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या मार्गावरील उड्डाणपुलाची एकूण संख्या १४६ झाली आहे