मुंबई – गावी जाऊन मनसोक्त खेळणे, रानावनात अनवाणी फिरणे, रानमेवा खाणे, नव-नवीन कला शिकणे या साऱ्या मजा-मस्तीतून आज अखेर राज्यातील विद्यार्थ्यांना पाठीवर दप्तर घेऊन शाळेत जावे लागले. उन्हाळ्याची सुट्टी संपल्याने आज विदर्भ वगळता राज्याच्या इतर भागांतील शाळांच्या घंटा पुन्हा वाजल्या. शाळेचा पहिला दिवस म्हणून शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कुठे फुल देऊन, तर कुठे औक्षण करून असे वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत केले. तसेच काही ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रसन्न वाटावे यासाठी शिक्षकांनी फुगे, पताका लावून वर्ग सजावट केली होती आणि फळ्यावर छान शुभेच्छा व स्वागताचे संदेश लिहिले होते. तसेच आपल्या मुलांच्या शाळेच्या पहिल्या दिवसासाठी पालकही विशेष उत्सुक होते. आज सकाळीच अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या पाल्याचा गणवेशातील फोटो पोस्ट केला.
लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू होते. त्यामुळे शालेय शिक्षणावर मोठा परिणाम झाला. यंदा काही महिन्यांपूर्वी शाळा, महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू करण्यात आली होती, मात्र उन्हाळी परीक्षा घेतल्यानंतर सुट्टी सुरू झाली. त्यानंतर आता नवीन शैक्षणिक वर्षापासून शाळा प्रत्यक्ष सुरू होत असल्याने आगामी काळात शालेय शिक्षण पूर्ववत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्यातील शाळा १३ जूनपासूनच सुरू झाल्या होत्या. परंतु यंदा कोरोनाच्या उपाययोजना करण्यासाठी शाळांना दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला आणि त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच आजपासून विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे विदर्भातील शाळा आजपासून नाही, तर २७ जूनपासून सुरू होणार आहेत. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता तेथील शैक्षणिक वर्ष २३ जून रोजी सुरू होऊन महिन्याचा चौथा सोमवार, म्हणजेच २७ जून रोजी विद्यार्थ्यांना शाळेत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.