नांदेड – महाराष्ट्रातील जलक्रांतीचे प्रणेते शंकरराव चव्हाण यांची नात आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण लवकरच राजकारणात एन्ट्री करणार आहे. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या स्वागताचे बॅनर नांदेडमध्ये लागले आहेत. त्यावर श्रीजयाचा फोटो झळकला आहे. त्यामुळे ती राजकारणात सक्रिय होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तिच्या रूपाने चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात उतरणार आहे.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सुरू आहे. लवकरच ही भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येणार आहे. त्यानिमित्त नांदेडमध्ये बॅनर लागले आहेत. राहुल गांधींच्या स्वागताच्या लागलेल्या सर्व बॅनर्सवर अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजयाचे फोटो झळकत आहेत. त्यामुळे ती राजकारणात सक्रिय सहभाग घेण्याची शक्यता आहे. तिला आजोबा आणि वडिलांकडून राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे. त्यामुळे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत लेक राजकारणात सक्रिय होणार आहे. २०१९ मध्ये अशोक चव्हाण यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांच्या राजकारणाची सर्व सूत्रे श्रीजया पडद्यामागून सांभाळत होती. निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा पराभव झाला तरी श्रीजयाने प्रचार यंत्रणा उत्तम सांभाळली होती. अशोक चव्हाणांना श्रीजया आणि सुजया अशा २ मुली आहेत. कायद्याचे शिक्षण घेतलेली श्रीजया नांदेडमधील राहुल गांधींच्या स्वागत बॅनरवरून राजकारणात एन्ट्री करण्याची चर्चा सुरू झाली आहे.