देहरादून : मागील दोन वर्ष कोरोनामुळे केदारनाथ, चारधाम यात्रा बंद होती. अशातच आता महाशिवरात्रीला केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली. त्यामुळे आता चारधाम यात्रेला जाणाऱ्या भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असता आजपासून यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली.
पर्यटन विभागाने नोंदणीबाबत चार पर्याय दिले आहेत. यात registrationandtouristcare.uk.gov.in या पर्यटन विभागाची वेबसाइटचा वापर करता येईल. व्हॉट्सअॅप क्रमांक ८३९४८३३८३३, त्याचबरोबर टोल फ्री क्रमांक १३६४ आणि मोबाइल अॅप टुरिस्टकेअर उत्तराखंड याद्वारे ऑनलाइन नोंदणी करता येईल. आज सकाळी ७ वाजल्यापासून वेबसाइट, टोल फ्री क्रमांक, व्हॉट्सअॅप क्रमांक आणि मोबाइल अॅपवर नोंदणी सुरू झाली.
एप्रिल महिन्यात चारधाम यात्रा सुरू होईल. केदारनाथ आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे २५ एप्रिल आणि २७ एप्रिल रोजी उघडतील. गंगोत्री धामचे दरवाजे २२ एप्रिलला उघडले जातील.