जळगाव – जळगाव जिल्हा कोरोनामुक्त झाल्यानंतर चार महिन्यांनी जिल्ह्यात पुन्हा एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. चाळीसगाव येथील ६३ वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला असून बुधवारी दोन नवे रुग्ण आढळून आले.
जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारी २०२२ अखेर कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याचे चित्र निर्माण झाले. त्यानंतर ही सौम्य लाट ओसरली. रुग्ण घटू लागले व मृत्यूही थांबले. परंतु जिल्ह्यात तिसऱ्या लाटेत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या मृत्यूनंतर तब्बल चार महिन्यांनी कोरोनामुळे एका मृत्यूची काल बुधवारी नोंद झाली. त्यामळे चौथ्या लाटेच्या संभाव्य धोक्याने चिंता वाढवली आहे. असे असताना गेल्या आठवडाभरापासून राज्यात रुग्णसंख्या वाढू लागल्याने चौथ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून एक-दोन रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी एकाच दिवसात तब्बल ६ रुग्णांची भर पडून सक्रिय रुग्णसंख्या १६ वर पोहोचली.