संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

चिंचवड आणि कर्जत स्थानकावर आता लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पिंपरी – पुणे जिल्ह्यातील मावळ मतदार संघात येणाऱ्या चिंचवड आणि कर्जत रेल्वे स्थानकावर आता लांब पल्ल्याच्या काही रेल्वे गाड्या थांबणार आहेत. त्याचप्रमाणे पुणे-मुंबई-पुणे दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता पास सुविधा मिळणार आहे, अशी माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. खासदार बारणे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन त्यासंदर्भात त्यांच्याकडे मागणीचे निवेदन दिले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री दानवे यांनी लगेच तशा सूचना संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

कोरोना काळानंतरही या दोन्ही रेल्वे स्थानकांवर रेल्वे गाड्या थांबत नसल्याने मावळ लोकसभा मतदारसंघातील मुंबई, पुण्यात जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे या दोन स्थानकांवर गाड्या थांबविण्याची विनंती बारणे यांनी केली होती. कोरोना कालावधीनंतर पूर्वीप्रमाणे रेल्वे गाड्या धावत आहेत पण एमएमआरडीए क्षेत्रात सीएसटीएम ते कसारा, कर्जत, खोपोली, सीएसटीएम ते पेण, रोहा, चर्चगेट, डहाणू या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या सर्व गाड्यांनी कर्जतवरील आणि पेण रेल्वे थांबा बंद केला आहे. दादर-रत्नागिरी दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचाही थांबा बंद केला.

याआधी डेक्कन एक्सप्रेस चिंचवड आणि कर्जत रेल्वे स्थानकावर थांबत होती. आता त्याचा थांबा लोणावळा केला आहे. त्यामुळे कर्जत स्थानकावरील नागरिकांना रेल्वे पकडण्यासाठी कल्याण, बदलापूर स्थानकावर जावे लागत आहे. मध्य रेल्वे प्राधिकरणाने अनेक गाड्यांचा चिंचवड, कर्जत येथील थांबा बंद केला आहे. दुसऱ्या पाळीत काम करणाऱ्या बदलापूर, नेरळ, अंबरनाथ, खोपोली आणि कर्जत येथील नागरिकांना कोणार्क एक्सप्रेसचा उपयोग होतो. परंतु कोणार्क एक्सप्रेस पुण्यात रात्री उशिरा येते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. यापूर्वी कर्जत स्थानकावर गाडी थांबत होती. परंतु येथील थांबा बंद केल्याने नागरिकांना कल्याण स्थानकावर जावे लागते. कल्याण आणि कर्जतकडे जाणारी पहिली रेल्वे पहाटे साडेपाच वाजता आहे. नागरिकांना पहाटे तीनपासून या गाडीची वाट पाहत बसावे लागते. दक्षिण भारतातून येणाऱ्या चेन्नई, कोणार्क, कन्याकुमारी, महालक्ष्मी, सिंहगड, अहिंसा, कोल्हापूर, सह्याद्री, डेक्कन एक्सप्रेस अशा १८ रेल्वे गाड्यांनी कर्जत, चिंचवड स्थानकावरील थांबा बंद केला आहे. मात्र आता या सर्व गाड्या कर्जत आणि चिंचवड स्थानकावर थांबणार असल्याची माहिती खासदार बारणे यांनी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami