नवी दिल्ली – नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (NSE) माजी एमडी चित्रा रामकृष्णन यांच्यावर लूक आऊट नोटीस बजावण्यात आली आहे. अध्यात्मिक गुरूच्या सांगण्यावरून चित्रा शेअर मार्केट चालवत असल्याची धक्कादायक माहिती नुकतीच जाहीर झाली होती. सेबीने हा खुलासा केल्यानंतर या प्रकरणाची गंभीर आयकर विभागाकडून दखल घेण्यात आली आहे. तसेच त्यांची CBI चौकशीही सुरू करण्यात आली आहे.
नुकताच सेबीनं (SEBI) हा धक्कादायक खुलासा केला होता. यानंतर आता या प्रकरणाची गंभीर दखल इन्कम टॅक्स विभागानं घेतली असून रामकृष्णन यांच्या मुंबईतील घरासह इतर विविध ठिकाणांवर छापेमारी सुरु केली आहे.
रवी नायर, आनंद सुब्रमण्यम आणि चित्रा रामकृष्णन या तिघांविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.
चित्रा रामकृष्णन या NSE मध्ये कार्यरत असताना आनंद सुब्रमण्यम यांची NSE च्या समूह संचालन अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकांच्या सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. यासाठी त्यांनी नियमांचे उल्लंघन केले होते. त्यामुळे आयकर विभागाने चित्रा यांच्या मुंबईतील घरात छापेमारी सुरू केली.
दरम्यान, सेबीनं नुकतंच खुलासा करताना म्हटलं होतं की, हिमालयातील एका गुरुच्या सांगण्यावरुन NSEच्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण प्रत्येक निर्णय घेत होत्या. विशेष म्हणजे या गुरुला चित्रा यांनी स्वतः काधीही पाहिलेलं नाही. तीन वर्षे राष्ट्रीय स्टॉक एक्स्चेंजचं काम त्यांनी या गुरुच्या सांगण्यावरुनच करत होत्या, असा दावा करण्यात आला आहे.