चीनची टेनिसपटू अचानक बेपत्ता! संयुक्त राष्ट्रांकडून चौकशीची मागणी

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

नवी दिल्ली – एका माजी उच्च सरकारी अधिकाऱ्यावर लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर चीनची व्यावसायिक टेनिसपटू पेंग शुआई अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत तिचा ई-मेल आल्यानंतर तिच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. मात्र चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, जगभरातील ऍथलीट्स आणि पेंग शुआईच्या हितचिंतकांनी तिच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेने पेंग शुआई बेपत्ता झाल्याच्या या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली .

जगभरातून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत. याविषयी विचारले असता परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी शुक्रवारी बीजिंगमध्ये एका पत्रकार परिषदेत सांगितले की, हे प्रकरण राजन्यायिक नाही आणि मला याबाबतची माहिती नाही. तसेच महिला टेनिस असोसिएशनचे सीईओ आणि अध्यक्ष स्टीव्ह सायमन यांनी तिला पाठवलेल्या ईमेलच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यामध्ये पेंगने आपण सुरक्षित असल्याचे आणि छळाचे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. चीनची सरकारी माध्यम प्रसारक सीसीटीव्हीच्या आंतरराष्ट्रीय युनिट सीजीटीएनने गुरुवारी हा ई-मेल पोस्ट केला. सायमनने म्हटले आहे की, मला खात्री नाही की, तो ई-मेल शुआईने लिहिला होता. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणीही सायमन यांनी केली आहे. योग्य उत्तर न मिळाल्यास स्पर्धांचे यजमानपद चीनकडून हिरावून घेतले जाऊ शकते, असा इशाराही सायमन यांनी दिला आहे. नाओमी ओसाका आणि नोव्हाक जोकोविच यांनीही या प्रकरणी ट्विट केले आहे. ‘व्हेअर इज पेंग शुआई’ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. सेरेना विल्यम्सने ट्विट केले की, ‘या बातमीने मला धक्का बसला आहे आणि दु:ख झाले आहे. आपण गप्प बसायला नाही पाहिजे. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी.’ तर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या प्रवक्त्या हीथर बोलेर यांनी सांगितले की, त्या चीनी टेनिस महासंघाच्या संपर्कात आहे आणि डब्ल्यूटीए व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीशीही चर्चा करत आहेत.

Close Bitnami banner
Bitnami