बीजिंग – जिथे जगातला पहिला कोरोना रुग्ण आढळला होता, त्या चीनबाबत थोड्याफार प्रमाणात मात्र सर्वांच्याच मनात भीती बसली आहे. त्यातच आता तर ‘एन्ड ऑफ द वर्ल्ड’ या चित्रपटातील एक दृश्य हुबेहूब चीनमध्ये दिसून आले आहे. चीनच्या झोउशान शहरात निळे आकाश चक्क लोखंडासारखे लालभडक दिसू लागले आहे. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून हा जगाचा अंत तर नाही ना, अशी भीती वाटू लागली आहे. तसेच अनेकजण यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु अशा परिस्थितीत तेथील स्थानिक माध्यमे लोकांना आधार देण्याचे काम करत आहेत. आकाशातील लाल रंगाबाबत पसरत असलेल्या अफवा चुकीच्या असल्याचे सांगून हे दृश्य लाईट रिफ्रेक्शनमुळे दिसत असल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे.
तर, ‘हवामान जेव्हा सुरळीत होते, तेव्हा वातावरणातील अधिकच्या पाण्यातून एअरोसोल्स तयार होतात. ते फिशिंग बोट्सच्या लाईटला स्केटर आणि रिफ्लेक्ट करतात. त्यामुळेच आकाश लाल दिसते’, असे झोउशान मेट्रोलॉजिकल ब्युरोने ग्लोबल टाइम्सला सांगितले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर हे आकाश अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. अनेकांना ते अतिशय सुंदर, तर अनेकांना अतिशय भयानक वाटत आहे. सध्या या लाल आकाशाचे फोटो आणि व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर फिरत आहेत.